विकासात्मक कामांमुळेच शिवसेना पक्षात प्रवेश

102 गावातील कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केले मत

सणबूर – आमदार शंभुराज देसाई यांचे पाच वर्षात मतदार संघात सुरु असलेल्या विकासात्मक कामामुळेच आम्ही त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहोत. आ. देसाई यांच्या सोबतीने विकासप्रवाहात सामील झाल्याचा आम्हाला आनंद होत आहे, असे मत पाटण तालुक्‍यातील 102 गावातील पाटणकर गटातील 1621 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दौलतनगर ता. पाटण येथील येथील आयोजित प्रवेश मेळाव्यात व्यक्‍त केले.

आ. देसाई हेच मतदारसंघाचा कुशलपणे विकास करु शकतात अशी खात्री झाल्यानेच आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य केले असून याचा आम्हाला अजिबात पश्‍चाताप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. देसाई यांनी नवे जुने न करता सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने मतदार संघाचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांची उपस्थिती होती.

आमदार देसाई म्हणाले, पाटणकर गटाला कंटाळून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्यांचे मी शिवसेना पक्षात पक्षाचा आमदार या नात्याने जाहीर स्वागत करतो. ज्या विकासाच्या मुद्द्यासाठी आपण एकत्र आलो आहोत तो विश्वास सार्थ करण्याचेच काम मी भविष्यात करणार आहे. सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यास मी कटीबध्द आहे. पाटणकर गटाच्या नेतृत्वाला कंटाळून रोज नव्याने अनेकांचा जाहीर प्रवेश होत आहे यावरुनच मतदार संघाचे विकासात्मक नेतृत्व कोण आहे हे सिध्द होते, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.