मंचर – पुणे जिल्ह्यात आगामी नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढविल्या जातील. युवक-युवतींना प्राधान्य दिले जाईल, असे आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे आम आदमी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनावेळी किर्दत बोलत होते. यावेळी आंबेगाव, जुन्नर व खेड तालुका आम आदमी पक्ष संघटक, कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी पुणे जिल्हा सचिव अक्षय शिंदे, नामदेव पोखरकर, जुन्नर तालुका समन्वयक संजय चव्हाण, अनिल भोर, गणेश टाव्हरे, सयाजी शेवाळे, ज्ञानदेव खिलारी, सुनील खिलारी, राजेश जाधव, रहेमान इनामदार, अंकुश राठोड, अतुल शेंडे उपस्थित होते.
किर्दत यांनी केजरीवाल यांच्या मेक इंडिया नं. 1 कॅम्पेनची माहिती दिली. ते म्हणाले आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील सामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न व शिक्षण, आरोग्य, वीज,पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
महागाईने जनता त्रस्त झाली आहे. दूध, दही यावरही कर भरावा लागतो. नवी दिल्लीत जनतेला शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मोफत मिळतात. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही सुविधा मिळाल्या पाहिजेत, हे पक्षाचे धोरण आहे. पक्ष सभासद नोंदणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुका संघटक सलीम इनामदार यांनी प्रास्ताविक व वैभव टेमकर यांनी आभार मानले.