पुणे – संततधार पावसाने झाडाची फांदी घर आणि वीज खांबावर कोसळली. ही घटना शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास बुधवार पेठ परिसरातील मोती चौकाजवळ घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही फांदी विजेच्या खांबावर पडल्याने अनर्थ घडण्याची भीती होती.
यशदा हॉस्पिटलशेजारच्या लेनमध्ये हे झाड आहे. शनिवारी दिवसभर मोठा पाऊस सुरू होता. याचदरम्यान ही झाडाची फांदी घर आणि विजेच्या खांबावर कोसळली. यामुळे विजवाहिन्या तुटल्या. घराच्या छताचे काही प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत ही कोसळलेली फांदी हटवली.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील झाडांच्या धोकादायक फांद्या हटवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली. यानंतर हे पथक पुन्हा फिरकलेच नाही. त्यामुळे ही घटना घडली आहे.