सातारा – खटाव तालुक्यातील एका गावात एका मातेनेच आपल्या अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराला पाठीशी घालत मुलीलाच धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुलीच्या आईसह अन्य एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील एका गावात एका कुटुंबामधील तक्रारदाराची पत्नी अन्य पुरुषासोबत निघून गेली होती. तक्रारदारास 7- 8 वर्षाच्या दोन मुली व एक लहान मुलगा आहे. मुली लहान असल्याने मुलींना आईची आठवण येत असेल या भावनेतून पित्याने एक दिवस आपल्या मुलीस आपण लवकरच तुझ्या आईला परत आणू, असे म्हटले.
त्यावर मुलगी म्हणाली, “काही नको. आई वाईट आहे.’ यानंतर त्या मुलीने तिच्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती पित्यास सांगितली. पित्यास ही घटना समजल्यानंतर पिता आपल्या मुलीसमवेत वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता पोलीसांनी त्यांच्या फिर्यादीकडे कानाडोळा केला. त्यामुळे त्या पित्याने तडक वडूज न्यायालयात आपली कैफियत मांडली. फिर्यादीतर्फे ऍड. धीरज घाडगे यांनी काम पाहिले. न्यायालयाने त्या पित्याची भावना समजून घेतल्यानंतर फिर्याद दाखल करुन घेण्याचे आदेश वडूज पोलिसांना दिले. जे पोलीस फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते, त्यांचीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारसंबंधित मुलीच्या आईसह आणखी एकाविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.