पुणे -करोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नास मर्यादा आल्याने या साथीचा सामना करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने महापालिकेने शहरातील नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पुणेकरांनी महापालिकेच्या कोविड सीएसआर खात्यात जमा केलेल्या रकमेतील तब्बल 7.22 कोटी रुपये अद्यापही पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महापालिकेला 2020-21 मध्ये 4.89 कोटी तर 2021-22 मध्ये 3.10 कोटी एवढ्या रकमेच्या देणग्या दिल्या. मात्र, महापालिकेने 2020-21 मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही. तर 2021-22 मध्ये 1.30 कोटी रुपये करोना बेड व ऑक्सिजनवर खर्च केले. आजवर यातील शिल्लक रकमेवर 54 लाख रुपये व्याज महापालिकेला मिळाले. दरम्यान, हा निधी पडून न ठेवता महापालिकेच्या मालकीच्या रुग्णालयांसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.