कराड – विनापरवाना गावठी पिस्तूल विकण्याच्या उद्देशाने कराडमध्ये आलेल्या मनोज राजेंद्र खांडेकर उर्फ एमके (वय 23, रा. जुळेवाडी, ता. कराड) याला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवारी (दि. 9) रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून 60 हजार रुपये किमतीचे पिस्तूल व मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, कराडमधील ईदगाह मैदान परिसरात एक युवक गावठी पिस्तूल विकायला येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना कारवाईची सूचना दिली. डांगे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा रचला. संशयित मनोज खांडेकर हा साई मंदिरासमोरून लक्ष्मी मंदिराकडे
जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत 60 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व मॅगझीन सापडले. पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार देसाई, संजय जाधव, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, देशमुख, सांडगे यांनी ही कारवाई केली.