पाटण – सडावाघापूर पठारावरील उलटा धबधबा पाहण्यास गेलेल्या दाम्पत्याबाबत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हुल्लडबाज युवकांच्या टोळक्याने पत्नीकडे बघून आरडाओरडा केल्याची संतापजनक घटना घडली. याबाबत संबंधितांना विचारणा करायला गेलेल्या पतीला पत्नीसमोरच टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी
पत्नीने मल्हारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील पती व पत्नी हे दोघे पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे उलटा धबधबा पाहण्यासाठी आले होते. यावेळी ते दोघेजण सेल्फी घेत असताना त्याठिकाणी असणाऱ्या युवकांच्या टोळक्याने पत्नी-पत्नीकडे पाहून आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. यावेळी पतीने संबंधित युवकांना आरडाओरडा का करताय? असा जाब विचारला असता चिडून जावून पाच ते सहा युवकांच्या टोळक्याने पतीला पत्नीसमोरच बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्याचबरोबर पतीला मारहाण करताना भांडणे सोडवण्यास गेलेल्या पत्नीलाही त्या युवकांच्या टोळक्याने धक्काबुक्की केल्याचे पत्नीकडून सांगण्यात आले. या मारहाणीत पतीला जबर मार लागला आहे. त्यानंतर पत्नीने मल्हारपेठ येथील पोलीस ठाण्यात संबंधित सहा युवकांविरोध फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आनंद आवाड तपास करत आहे.
सदर गुन्ह्याबाबत पाटण पोलिसांची गुप्तता
वरील प्रकाराबाबतची तक्रार मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा पाटण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याबाबतची सखोल माहिती घेण्यासाठी पाटण पोलिसाशी संपर्क साधला असता गुन्ह्यातील संशयितांची नावे देण्याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली. त्यामुळे यामध्ये कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अशी चर्चा सुरु आहे.
टवाळखोर, हुल्लडबाजांना आवर घालावा
सध्या पाटण तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील नवजा/ओझर्डे, सडावाघापूर, रामघळ यासह अन्य धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पोलीस व प्रशासनाने खबरदारी म्हणून, तसेच टवाळखोर व हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांमधून होत आहे.