लोणंद – दापकेघर (ता. खंडाळा) येथील धरणग्रस्त, विस्थापित शेतकरी कुटुंबातील कोमल नंदकुमार देशपांडे हिने कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता गेली सहा वर्षे केवळ अभ्यासिकेत अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत पोलीस दलातील फौजदार पदाला गवासणी घातली आहे. त्याबद्दल तिचे कौतूक होत आहे.
भोर तालुक्यातील दापकेघर हे गाव नीरा -देवघर धरणाच्या पाण्यात गेल्याने सर्वांना तेथून विस्थापित व्हावे लागले. शासनाने त्यांना खंडाळा तालुक्यात शेडगेवाडी गावच्या हद्दीत गावठाण व शेतजमीन दिली आहे. गावातील भले मोठे घर, वाडा, जमिन सोडून नंदकुमार देशपांडे यांच्याही कुटुंबाला गावकऱ्यांसमवेत विस्थापित व्हावे लागले. श्री. देशपांडे हे 2000 साली खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी गावच्या हद्दीत नवीन पुनर्वसीत दापकेघर येथे वास्तव्यास आले. मुलगा नाही, लहान लहान पाच मुलीच. मात्र त्यांनी त्याबद्दल कधीच खंत बाळगली नाही. आपल्याला परिस्थितीमुळे शिकता आले नाही.
मात्र आपल्या मुलींनी चांगले शिकावे सरकारी अधिकारी व्हावे, अशी इच्छा बाळगून मुलींनाच मुले मानून त्यांना दर्जेदार व उच्चविभूषीत शिक्षण देण्यासाठी त्यांना घडवण्यासाठी नंदकुमार देशपांडे पती पत्नी अहोरात्र मेहनत घेत होते. त्यातून त्यांच्या पाचही मुली उच्चशिक्षीत झाल्या आहेत. पाचपैकी तीन मुली इंजिनिअर, एक एमबीए करुन वकील झाली आहे तर थोरली मुलगी कोमलने सहा वर्षे पुण्यात राहून कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता केवळ अभ्यासिकेतील अभ्यासाद्वारे पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिने समाजासाठी न्याय भावनेतून चांगले काम करत रहावे, अशी भावना कोमल यांचे वडील नंदकुमार देशपांडे यांनी व्यक्त केली.
कोमल यांचे माध्यमिक शिक्षण अंदोरी (ता. खंडाळा) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुणे येथील ज्ञानगंगा पॉलिटेक्निक संस्थेतून संगणक टेक्नॉलॉजी डिप्लोमा तर पुणे येथील नवसह्याद्री कॉलेजमधून कॉम्प्यूटर इंजिनीअर पदवी घेतली. 2016 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरू केली. आता पीएसआय पदासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल मिलिंद पाटील, डॉ. नितीन सावंत, खंडाळा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. सर्फराज बागवान, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या दिपाली साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, दापकेघरचे सरपंच अमोल पावगे, वाठार बुद्रूकचे सरपंच, अंदोरीचे शामराव धायगुडे, अशोकराव धायगुडे, काशिनाथ धायगुडे, प्रा. नानासो ननावरे, फलटण पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच अंदोरी, शेडगेवाडी, भादे, वाठार बुद्रूक व लोणंद येथील अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जावून अभिनंदन केले.