पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी पीएमपीच्या नऊ डेपोतील 38 बस तैनात ठेवण्यात आल्या आहेत. शहरात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे पूरस्थिती उद्भवल्यास अथवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यांना मदत किंवा स्थलांतरासाठी या बसचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीच्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नऊ डेपोंमधील 36 बस 24 तास तैनात असणार आहेत. त्याचा उपयोग नागरिकांचे स्थलांतर करणे किंवा सुरक्षित स्थळी हवलिण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे बसचालक डेपोप्रमुखांची माहिती पीएमपीकडून देण्यात आलेली आहे.
राज्यभर पावसाचा रेड, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मावळ परिसरातही घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात अचानक आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते. अशा स्थितीत संबंधित नागरिकांना गरज लागल्यास मदत म्हणून नऊ डेपोमध्ये 38 बस तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात काही डेपोमध्ये तीन, काही डेपोमध्ये सहा तर काही डेपोमध्ये नऊ बस तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत.
शहरात सध्या पूरस्थिती स्थिती नाही. मात्र, वेळेवर गरज लागू शकते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे. दिवसा किंवा रात्री, गरज लागेल त्यावेळी बसची सुविधा पीएमपी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. त्याची सर्व तयारी प्रशासनाने केलेली आहे.
नियंत्रण कक्षाकडे माहिती उपलब्ध
नियंत्रण कक्षाकडे नऊ बस डेपो प्रमुख, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, 30 जणांचे मोबइल क्रमांक देण्यात आलेले आहेत. खास करून रात्रीच्या वेळी मदत मिळावी म्हणून चालक राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तर, दिवसा बसची मागणी झाल्यास मार्गावरील बस वळविण्यात येणार आहेत. तसेच या बस प्रामुख्याने सीएनजी बस आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व तयारी ठेवण्यात आली आहे.