श्रीगोंदा -एका जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याने श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याविषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.20) श्रीगोंदा पोलिसांनी शहरातील सृष्टी हॉटेलमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केले होते. या रागातून बाबासाहेब भोस यांनी शुक्रवारी (दि.22) दुपारी तीन वाजेच्या सुमारास फोनवरून माझ्यासोबत धमकीचे संभाषण केले. तसेच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याविषयी अरेरावीची व अश्लील भाषा वापरली.
मी शासकीय कर्तव्य बजावत असताना केलेल्या छाप्याच्या कारवाईच्या रागातून मला फोनवरून दमदाटी केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‘तो’ मोबाईल शेलारांचा..!
सृष्टी हॉटेलचे मालक हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या कारवाईबाबत माहिती विचारण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल पितळे यांना केलेल्या फोनवर सुरुवातीला शेलार हे बोलले. त्याच फोनवरून बाबासाहेब भोस यांचे फिर्यादी पितळे यांच्याशी संभाषण झाल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षाच्या नातेवाईकासाठी माजी अध्यक्ष अडचणीत आल्याची चर्चा रंगली होती.