पुणे – लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबईसारख्या शहरांत व्यवसाय ठप्प आहेत. व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. दुकानांच्या भाड्याबाबत राज्य सरकारने अस्पष्ट भूमिका घेतल्यामुळे दुकानदारांकडे मालकांनी भाड्यासाठी तगादा लावला आहे. या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनकाळात दुकानांचे भाडे घेऊ नये. तसेच, पुढील वर्षभरासाठी भाड्यात दुकान मालकांनी सरसकट 50 टक्के कपात करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड. विकास शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पुण्यासारख्या शहरांमध्ये शंभर ते दीडशे स्क्वेअर फुटाच्या दुकानांसाठी 40 ते 50 हजार रुपये प्रति महिना भाडे द्यावे लागते. लॉकडाऊनमुळे राज्यभरात सगळ्या प्रकारचे व्यवसाय, उद्योग बंद ठेवावे लागले आहेत. तरीही मालकांकडून भाड्यासाठी त्रास देण्यात येत आहे. दिल्लीमध्ये लॉकडाऊनच्या काळातील भाडे दुकान मालकांनी व्यावसायिक भाडेकरुना मागू नयेत, भाडेकरूंना भाड्यासाठी मालकांनी त्रास दिल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत दिल्ली सरकारने दिले आहेत.
महाराष्ट्रातील व्यवसाय आणि व्यावसायिक वाचवायचे असतील तर अशा प्रकारचा ठाम आणि स्पष्ट निर्णय महाराष्ट्र शासनाने घेण्याची गरज आहे. यामुळे, दुकान मालक आणि व्यावसायिक दोघांचाही फायदा होणार असून व्यावसायिक टिकाव धरू शकतील. जे दुकान मालक या आदेशाचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.