पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत करोना संसर्ग नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने खाजगी प्रयोगशाळेला मोबाइल तपासणी केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. गोळीबार मैदान येथे हे तपासणी केंद्र असणार आहे.
लष्कर परिसरात करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेत, तपासणी करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांमधील स्थिती पाहता, काही नागरिक खासगी प्रयोगशाळांमधून तपासणी करण्याला प्राधान्य देत आहे. त्यासाठी ऑनलाइन विचारणादेखील केली जात आहे. मात्र, स्वॅब तपासणीसाठी घरी येणारे वैद्यकीय कर्मचारी हे पूर्ण सुरक्षा किट परिधान करून येत असल्याने नागरिक त्यांना बोलावण्यासाठी धजावत नसल्याचे समोर आले आहे.
ही स्थिती टाळण्यासाठी काही प्रयोगशाळांनी मोबाइल प्रयोगशाळा सुविधा उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. यावर विचार करत “आयसीएमआर’ संस्थेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या बायोजिनिक्स लॅब या प्रयोगशाळेला परवानगी दिल्याचे बोर्ड प्रशासनाने म्हटले आहे.
बाधिताला स्वत:लाच करावा लागणार खर्च
करोना झाल्यानंतर उपचारासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च त्या व्यक्तीला स्वत:लाच करावा लागणार आहे. प्रत्येकाने या परिस्थितीत काम करताना व्यापारी, कामगारांचा विमा काढावा. प्रतिमाह नाममात्र दरात हा विमा निघतो. विमा सुरू करण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून, माहिती देण्यास लावून चेंबरतर्फे मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.