ठाणे – “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो दमदाटी करून बंद पाडल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाण्यातील वर्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारदार परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, ते आणि त्यांची पत्नी “हर हर महादेव’ हा चित्रपट पाहण्यासाठी विवियाना मॉलमध्ये गेले होते. हा चित्रपट सुरू असताना माजी मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते तो चित्रपट बंद पाडण्याच्या उद्देशाने आले. त्यांनी चित्रपटामध्ये चुकीचे दृष्य दाखवले जात असल्याने हा चित्रपट बंद करा, असे बोलून चित्रपट बंद पाडला.
यावेळी चित्रपट पाहणाऱ्यांपैकी कोणीतरी इसमाने असे कसे कोणीही एैरा गैरा येईल व चित्रपट बंद पाडेल असे बोलला. त्याचा राग मनात धरून चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते प्रेक्षकांच्या अंगावर धावून आले. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी हे प्रथम असल्याने जमावातील 8 ते 10 लोकांना त्यांना व त्यांची पत्नी अशा दोघांना धक्काबुक्की केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
सत्तारांच्या शिवीगाळावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “ही महाराष्ट्राची..”
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याची माहिती संबंधित पोलिस अधिका-यांनी दिली.