मुंबई – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर सत्तारांच्या शिवीगाळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोखठोक भूमिका मांडली आहे. अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, तसेच अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये म्हटले की, “महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले. मात्र, अशाप्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे-वागणे ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.”
महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.
— Supriya Sule (@supriya_sule) November 8, 2022
राजकारणात सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्यापद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे थेट राज्यपालांना निवेदन
जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक असले तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.