सातारा – गोडोली नाका येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या युवकाचा खून झाला असून सुमारे दोन महिन्यानंतर एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. बालाजी सोमनाथ रेड्डी (वय 27, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या परप्रांतीय युवकाचे नाव असून याप्रकरणी नरेंद्र रामदिन चौधरी (मूळ रा.उत्तरप्रदेश) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 30 आक्टोबर गोडोली येथे तळ्याजवळ घडली होती. बालाजी व नरेंद्र हे दोघे कामानिमित्त सातार्यात वास्तव्य करत होते. मात्र जुन्या भांडणाच्या कारणातुन् नरेंद्र याने बालाजी याला लोखंडी रॉडने मारहाण केली. जखमी अवस्थेत बालाजी याला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, बालाजी याचा मृत्यू नेमका कशाने झाले हे त्यावेळी समोर येत नव्हते. वैद्यकीय चाचणीद्वारे मारहाणीत मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शहर पोलिसांनी घटनेची सखोल माहिती घेवून तपासाला सुरुवात केली. तपासामध्ये खून झाल्याचे समोर आले व त्यानुसार नरेंद्र चौधरी याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.