जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम
शिराळा (प्रतिनिधी) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांनी दि. 9 ऑगस्ट रोजी ॲडमिट करून न घेतल्याची तक्रार एका रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमधील रूग्णालयांची बेड्सची स्थिती व सदर रूग्णास वेळेवर कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेणे याचा लेखी खुलासा जिल्हा प्रशासनाने संबंधित रूग्णांलयांकडून मागविला आहे.
रूग्णांची हेळसांड कोणत्याही स्थितीत सहन केली जाणार नाही. अचानकपणे येणाऱ्या गंभीर स्थितीतील रूग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्सनी काही बेड्स राखीव ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी वारंवार दिल्या आहेत. असे असतानाही दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 या कालावधीत एका रूग्णास कुल्लोळी रूग्णालय, भारती हॉस्पिटल, सेवासदन हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल, सिव्हील हॉस्पिटल मिरज, मेहता हॉस्पिटल या सर्व रूग्णांलयांमध्ये ॲडमिट करून घेतले नाही. अशी तक्रार नातेवाईकांनी केली आहे.
वास्तविक रूग्णालयातील बेड्सची अद्ययावत माहिती रूग्णांना उपलब्ध व्हावी म्हणून बेड मॅनेजमेंट सिस्टीम तयार करण्यात आली आहे. रूग्णालयांमार्फत यामध्ये आयसीयू व जनरल वॉर्डमधील बेड्सची संख्या सातत्याने अद्ययावत केली जाते. तसेच जनरल वॉर्डमधील पॉझिटिव्ह रूग्ण व संशयित रूग्ण यांच्या माहितीबाबतही दैनंदिन अहवाल घेण्यात येतो. असे असतानाही अत्यावस्थ स्थितीतील रूग्णास सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत यातील एकाही हॉस्पिटलने ॲडमिट करून घेतले नाही. या बाबीची गंभीर दखल घेऊन वरील सर्व रूग्णांलयांना नोटीस बजावण्यात आल्या असून यामध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.