मुंबई – विधानसभा निवडणुकीत डावलले गेलेल्या भाजप नेत्यांना नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे तिकीट नाकारले गेलेल्या पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नवी जबाबदारी मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपमधील हे संघटनात्मक फेरबदल जुलै महिन्यात होण्याचे संकेत आहेत. भाजपच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले. तसेच विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हे आहेत.
तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट विधानसभा निवडणुकीत कापल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका बसला होता. चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे नेते आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेली समाज भाजपसोबत होता. गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने विदर्भात सर्वाधिक 40 जागांवर विजय मिळवला होता. मात्र तेली समाजाची मतं फिरल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 30 जागांवर विजय मिळवता आला. यामुळे बावनकुळे यांनाही नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महामंत्री पदावर आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठवड्याभरात नवीन कार्यकारणी
भाजपामध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक बदल होत असतात. परंतु करोनाच्या संसर्गामुळे हे बदल अद्याप करण्यात आले नव्हते. मात्र कोणत्याही पद्धतीचा इव्हेंट न करता राज्याची नवी कार्यकारणी येत्या आठवड्यात घोषित केली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.