वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली येथील मुस्लीम बांधवांनी एकीकडे रमजानचा महिना सुरू असताना रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना मोफत अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
वाघोली येथील सन्नी अन्सारी मित्र परिवार यांच्या वतीने वाघोली (ता. हवेली) येथे पुणे-नगर महामार्गावरून पायी जाणाऱ्या कामगारांसाठी तीन दिवसांपासून जेवण, लहान मुलांसाठी फळे व बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली आहे. रोहित शिंदे, मोसिन आबा शेख, अतहर खान व मित्र परिवार यांचे सहकार्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत कामगार बांधवांसाठी जेवण उपलब्ध करून देण्यात येत असून सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे असंख्य कामगारांना रोजगार नाही. शासनाने परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची मुभा दिली आहे. त्या अनुषंगाने परराज्यात जाण्यासाठी खांदवे नगर येथे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वाघोली व परिसरातील कामगार गावी निघाले आहेत. नगर महामार्गावरून हजारोंच्या संख्येने मजूर पायपीट करताना दिसून येत आहेत. अशा कामगार बांधवांसाठी सनी अन्सारी व त्यांच्या मित्र परिवाराने गेल्या तीन दिवसांपासून वाघोली येथील नगर रोडवर असणाऱ्या फ्री बर्ड हॉटेल समोर रस्त्याने पायी जाणाऱ्या कामगार बांधवासाठी जेवण, लहान मुलांसाठी फळे, बिस्कीटचे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.