वडगाव मावळ, (वार्ताहर) – सध्या मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात मशिदीबाहेर रमजानमध्ये ईदची लगबग बघायला मिळते. रमजानसाठी सायंकाळी विविध उपवासाच्या खाद्यपदार्थांची रेलचेल दिसून येत आहे. रजमान ईद येत्या गुरुवारी (दि. ११) साजरी होणार असून त्यानिमित्त अत्तर, शेवई, सरबत, सुकामेव्याला मागणी आहे. तर, बाजारात या सर्वच प्रकारच्या साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे.
रमजान ईदनिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. सध्या अझूनही उपवास सुरू असल्याने उपवासातील मोठा घटक पदार्थ असलेला खजुराला मोठी मागणी आहे. विविध प्रकारातील खजूर बाजारात उपलब्ध झाले आहेत.
रमजान ईदसाठी सर्व काही नव्याने खरेदी केले जाते. त्यात कपड्यांपासून ते अत्तर, सुरमा, चप्पल यांचाही समावेश असतो. या सर्वांची खरेदी होताना दिसत आहे. बाजारात सुका मेवा, शेवई विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. सुका मेव्यामध्ये बदाम, मनुके, काजू, खजूर यांसह विविध प्रकारच्या शेवईंना मागणी आहे. तर, डोळ्यात घालण्यासाठी सुरमा, सुगंधी अत्तराने बाजारपेठ सुगंधी झालेली दिसत आहे. मुस्लिम बांधव ते खरेदी करत आहेत.
इफ्तार पार्ट्या
रमजानच्या पवित्र महिन्यात लहान-थोर कडक उपवास करतात. त्यामुळे इफ्तारसाठी मुस्लिम समुदायातील विविध संस्था, संघटनांतर्फे रमजानमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. यामध्ये उपवासाच्या पदार्थांचा आहार दिला जातो. त्यानिमित्त ठिकठिकाणी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.
त्यासाठी शरबत, खजुर, कबकब, हारमोनी, इराणी, जुमाबरा, कच्ची पटकीसह सुकरी या प्रकारातील खजुरांचा समावेश आहे. तसेच उपवास सोडण्यासाठी खास प्रकारचे मांसाहारी पदार्थांची मेजवानी असते. वर्षभरात रमजानच्या महिन्यात ठिकठिकाणी इफ्तार पार्टीच्या मेजवानीचा आस्वाद घेताना दिसून येत आहे.