पुणे – लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात एकत्र आहेत. याची परिणिती पती-पत्नीतील वाद वाढण्यास झाली आहे. या कालावधीत देशात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी नोंदविले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील अशा घटना वाढल्याचे म्हटले आहे. मात्र, पुणे शहरात पोलिसांच्या आकडेवारीवरून हे प्रमाण घटल्याचे दिसून येते.
यासंदर्भात शहरातील 30 पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची पडताळणी केली असता 10 मार्च ते 25 एप्रिल या काळात केवळ 17 गुन्हे दाखल झाले. दरम्यान, याच कालावधीत मुख्य नियंत्रण कक्षाला कौटुंबिक हिंसाचाराबाबत 173 कॉल आले. तर, राष्ट्रीय महिला आयोगाकडून लॉकडाऊन कालावधीत 10 तक्रार अर्ज पोलिसांना प्राप्त झाले आहेत. एक जानेवारी ते 25 एप्रिल या चार महिन्यांत शहरातील विविध पोलीस ठाण्यांत कौटुंबिक हिंसाचाराचे 100 गुन्हे दाखल आहेत, तर 2 हजार 852 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे.
तसेच 294 तक्रार अर्ज आले आहेत. लॉकडाऊन कालावधीत दाखल गुन्हे व तक्रार अर्जांचा विचार केला तर 10 मार्च ते 25 एप्रिल या सहा आठवड्याच्या काळात केवळ 17 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 808 अदखलपात्र गुन्हे असून, 82 तक्रार अर्ज मिळाले आहेत. त्यामुळे हे प्रमाण इतर कालावधीच्या तुलनेत कमी आहे.
लॉकडाऊनमुळे कमाईचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत महिलावर्ग पूर्णवेळ घरातच असल्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात महिला तक्रार देण्यासाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येता येत नाही. मात्र, भरोसा सेलच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून मदत मागत आहेत. अशा तक्रारदार महिला व त्यांच्या घरच्यांचे दूरध्वनीद्वारे सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी समुपदेशन करून समस्यांचे निराकरण केले आहे. तर याच काळात भरोसा सेल येथील महिला सहायक कक्षाकडे 92 तक्रार अर्ज मिळाले आहेत. तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून आलेले 10 तक्रार अर्ज आहेत असे एकून 132 तक्रार अर्ज एक खिडकीद्वारे प्राप्त झाले आहेत.
इतर कालावधीच्या तुलनेत सध्या कौटुंबिक हिंसाचाराबाबतीत दाखल तक्रारींचे प्रमाण कमी आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे. लॉकडाऊन कालावधीत दूरध्वनीच्या माध्यमातून महिलांना मदत केली जाते. या काळात मदत मागितलेल्या 45 महिलांच्या समस्यांचे निराकरण केले आहे.
– अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे