पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मागील तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने गुजरात राज्यातील बारडोली येथून अटक केली. आरोपी मागील बारा वर्षांपासून स्वतःचे नाव बदलून इतर राज्यात वास्तव्य करीत होता.
रहिम उर्फ वहिम अब्बास पटेल (वय ४५ रा. बारडोली जि. सुरत, गुजरात. मुळ रा. हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फरारी आरोपींचा शोध व अटकेचे आदेश देण्यात आले होते. वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी वहीम पटेल याला न्यायालयाने वॉरंट काढले होते.
मात्र, तो सापडत नसल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले होते. आरोपी पटेल याचा शोध घेण्यासाठी युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे यांच्या पथकाने वानवडी परिसरात त्याचा शोध घेतला. त्याचे नातेवाईक, मित्र यांची माहिती काढली मात्र, काहीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, फरार आरोपी वहिम पटेल हा नाव बदलून गुजरात राज्यातील बारडोली तालुक्यात राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार राजस शेख यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने १३ वर्षा पूर्वीचा आरोपीचा फोटो प्राप्त केला, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बारडोली येथे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता १२ वर्षापासून पोलिसांच्या अटकेला घाबरून वेगवेगळ्या ठिकाणी स्वत:चे नाव बदलून राहत असल्याचे सांगितले. आरोपीला पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.