Lok Sabha Election 2024 । भाजप पक्षाने वर्धा मतदार संघातून भाजप नेते रामदास तडस यांना उमेदवारी दिली. येत्या २० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामदास तडस यांच्यासाठी वर्ध्यात सभा घेणार आहे. मात्र, त्याआधी रामदास तडस यांना धक्का बसला आहे. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहे.
आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुषमा अंधारे आणि पूजा तडस यांनी सासरे आणि भाजप नेते रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप लावले.
रिपोर्टनुसार, रामदास तडस यांच्याविरोधात आता पूजा तडसही निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार आहेत, भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांची सून पूजा शेंद्रे तडस (३२) यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Lok Sabha Election 2024 । पूजा तडसने सासरे रामदास तडस यांच्यावर लगावले गंभीर आरोप
‘स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न लावून दिलं. मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला. त्यातून या बाळाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले’ असं दु:ख पूजा तडस यांनी मांडलं.
पूजा तडस पुढे म्हणाल्या,’खासदार म्हणतात डीएनए टेस्ट कर, तेव्हा समाजातल्या माझ्यासारख्या मुलींनी जायच कुठे? प्रत्येकवेळी अपमानास्पद वागणूक दिली. घरी गेली, तेव्हा लोखंडी रॉडने मारहाण केली. फ्लॅट विकला. मुलाला बेदखल केलं म्हणता, मग त्याला घरात का ठेवलय? असा सवालही पूजा तडस यांनी केला आहे.
दरम्यान, आता पूजा तडस यांच्या या गंभीर आरोपांवर स्वतः रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना रामदास तडस म्हणाले की, “2020 मध्ये पूजा आणि पंकजचं लग्न झालं. ते लग्न त्यांनी परस्पर केलं. त्यावेळेस पूजाचे कुटुंबिय होते. आमच्या कुटुंबाला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी वर्ध्याला एक फ्लॅट घेतला. दोघीही चांगले राहायला लागले.
एकमेकांना चांगलं समजून घ्यायला लागले. पण त्यानंतर काही समाजकंटकांनी पूजाला हाताशी धरुन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला. तुझ्या सासऱ्याकडे पैशांची मागणी कर, असं ब्लॅकमेलिंग केलं. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याची एक कॅसेट होती.
ती कॅसेट पंकजच्या हाती लागली. त्यानंतर त्यांच्यात आपापसात वाद झाला. त्यानंतर पंकज देवीला राहायला आला. तिथे त्याने देवीला एक घर घेतलं. तिथे त्याचं दुकान आहे. त्या दुकानाच्या वर तो राहतो. मी त्याला त्यावेळेसच बेदखल करुन टाकलं. त्यांची कोर्टात केस सुरु आहे”, अशी माहिती रामदास तडस यांनी दिली.
ते पुढे म्हणाले “त्यांनी लग्न केलं. त्यांनी सुखरूप राहावं. जर ते दोघं चांगले राहत असतील तर मी त्यांना आजही घरी ठेवायला तयार आहे. पण त्यांचं आपापसातच जमत नसेल, तुम्ही मुलाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची कॅसेट सापडली. प्रकरण कोर्टात आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून त्यांनी फॅमिलीचा मुद्दा समोर आणला.
कारण विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही म्हणून घरगुती प्रकरण समोर आणायचं आणि लोकसभेत अडथळा आणायचा हे विरोधकांचं षडयंत्र आहे. हे होणार होतं ते मला माहिती आहे.
कारण मी त्यांची मागणी मान्य केली नव्हती. माझ्याकडे पैसे नाहीत. मी पैसे देणार नाही. माझा या प्रकरणात दोष नाही. माझा दोष नसताना मला ब्लॅकमेल करता, हे बरोबर आहे का? हे प्रकरण 2020 आधीही आलं होतं’ अशी सविस्तर माहिती रामदास तडस यांनी यावेळी दिली.
Lok Sabha Election 2024 । नेमक काय म्हणाल्या सुषमा अंधारे
‘कारवाई टाळण्यासाठी म्हणून रामदास तडस यांच्या मुलाने पूजा तडसशी विवाह केला. पुढे त्या मुलीच काय झालं? मोदीच्या उमेदवाराने, मोदीजींचा परिवार संभाळला का? कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं. पत्नीला फ्लॅटवर नेऊन ठेवलं. पुढे तिची काय अवस्था झाली, ते पाहिलं नाही. तो फ्लॅट विकला, तिला बाहेर काढलं” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
हे वाचाल का ? शेअर बाजारात मंदीचा कल कायम ; सेन्सेक्स 73,000 च्या तर निफ्टी 150 अंकांनी घसरला