आठ दिवस 100% लॉकडाऊन; फक्त दवाखाने सुरू राहणार
पुणे – शहरातील करोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आज सोमवारपासून 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हे आदेश 17 मेपर्यंत कायम असतील. या कालावधीत केवळ खासगी दवाखाने सुरू ठेवण्यात येणार असून, इतर सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश रविवारी काढले आहेत.
या भागात आतापर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी नागरिक फिजिकल डिस्टन्स तसेच सुरक्षा नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर या भागात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने आठवड्यापूर्वीच शहरातील रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले 69 भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागांमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करतानाच; शहराच्या उर्वरीत भागातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. तर प्रतिबंधित भागात केवळ अत्यावश्यक सुविधांसाठीची (किराणा, भाजी, दूध,मेडीकल) यांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती.
महापालिकेकडून या भागातील सुमारे 70 हजार कुटुंबांना दूध भुकटी तसेच 15 दिवसांचे अन्नधान्य वाटप केले असून जवळपास 7 लाख नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्स देण्यात येणार आहे. तसेच या भागातील नागरिकांनी शहरातील इतर भागात संचार करू नये म्हणून या भागातील रस्ते पत्र्यांनी बंद करण्यात आले असून शहरातील सर्व बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुढच्या टप्प्यात या भागात 11 ते 17 मे पर्यंत केवळ दवाखाने सुरू ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी काढला असून आता या 69 प्रतिबंधित क्षेत्रात केवळ दवाखाने सुरू राहणार आहेत.
गरज भासल्यास दूध व भाजीपाला पुरविणार
दरम्यान, या भागात गरज भासल्यास महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसाठी भाज्या आणि दूध उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, ते सुद्धा महापालिका आणि पोलिसांच्या माध्यामातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर त्यासाठी त्या भागातील स्थिती लक्षात घेऊन मोकळ्या जागांमध्ये या सुविधा देण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.