पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरभर चौकाचौकांत लागलेले होर्डिंग्ज ( जाहिरात फलक) प्रकरणात महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहेत. या प्रकरणी महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले स्वत: मैदानात उतरले आहेत.
महापालिकेने जाहिरात फलकांना परवानगी देताना केवळ स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र घेऊन न थांबता जागेवर जाऊन पाहाणी करावी. तसेच ते धोकादायक असल्यास सात दिवसांत काढून टाकावे, असा सज्जड दम डाॅ. भोसले यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांसह परिमंडळ उपायुक्तांना भरला आहे.
तसेच, हा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय असून या प्रकरणी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. या वेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप उपस्थित होते.
शहरात २ हजार ५९८ जाहिरात फलक आहेत. त्यात अनेक नियमबाह्य असले तरी प्रशासनाकडून त्याला अभय दिले जात आहे. नवीन तसेच नूतनीकरणासाठी केवळ स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र घेऊन त्यांना मान्यता दिली जात आहे. मात्र, कधीही त्यानुसार तपासणी होत नाही. आकाशचिन्ह परवाना विभागाकडे स्ट्रक्चरल ऑडिट साठी कोणतीही यंत्रणा अथवा त्याच्याशी संबधित अभियंते नाहीत.
त्यामुळे केवळ वर्षभरापूर्वी रुजू झालेले कनिष्ठ अभियंते या तपासण्या करत आहेत. त्यामुळे खरेच किती होर्डिंग सुरक्षित आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर आयुक्त भोसले यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
आयुक्तांनी केली पहाणी
आयुक्त भोसले यांनी टिळक चौक ते जंगली महाराज मठापर्यंत जाहिरात फलकांची पाहणी केली. त्यात होर्डिंगचे अँगल, पोल धोकादायक दिसून आले. स्ट्रक्चरल ऑडिट केले असले तरी जुन्या इमारतींवरील होर्डिंगची तपासणी करा.
सुरक्षित नसतील तर होर्डिंग रद्द करा. त्याच प्रमाणे सेनापती बापट पुतळा येथे एकावर एक होर्डिंग उभे आहेत. काही ठिकाणी हॉटेलच्या आवारात होर्डिंग उभारले आहे. त्यावर बांधकाम विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
या आहेत आयुक्तांच्या सूचना
सात दिवसांच्या आत धोकादायक होर्डिंग्ज काढा
झाडे तोडून उभारलेले फलक तत्काळ काढा
नागरिकांच्या सुरक्षेबाबत तडजोड करू नका
सोसायटीने फलकासाठी जागा भाड्याने दिल्यास त्यांच्यावरही जबाबदारी
मान्यता घेऊन नंतर आकार बदलला असल्यास परवाना रद्द करणार
तपासणीत कुचराई केल्यास अधिकाऱ्यावर कारवाई