चिमुकल्या रुचिताचा आणखी एक आश्वासक व्हिडीओ व्हायरल!
बारामती – करोनाचा कहर भारतातही वाढतच चालला आहे. शासनाकडून करोनाला प्रतिबंध करण्यासाठी व करोनामुक्तीसाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे ३ मे नंतर आणखी दोन आठवडे लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे. बारामती शहर नुकतेच करोनामुक्त झाले असून येथील प्रशासनाने राबविलेला पॅटर्न सर्वांना दिशादर्शक ठरतो आहे. तुम्हालाही करोनामुक्त व्हायचं असेल तर बारामती पॅटर्न राबवा, असे लडिवाळपणे आणि आश्वसकपणे सांगतेय पाच वर्षांची चिमुकली रुचिता क्षीरसागर.
बारामतीतल्या अनेकान्त इंलिश मिडियम स्कुलमध्ये छोट्या गटात शिकणाऱ्या रुचिताचा खेळातून ‘स्टे अॅट होमचा’ सामाजिक संदेश देणारा व्हिडीओ नुकताच सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याची दखल प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियानेही घेतली होती. तिची आई बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात आरोग्य कर्मचारी असून तिचे वडील सातारा येथे शिक्षण विभागात वर्ग एकचे अधिकारी आहेत.
आता तिच्या नव्याने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बारामतीला करोनामुक्त केल्यामुळे सर्व बारामतीकरांचे तिने आभार मानले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही बोबड्या बोलीत तिने आभार मानले आहेत. बारामतीकरांनी कडक लॉकडाऊन पाळल्यामुळेच बारामती करोनामुक्त झाल्याचे ती सांगत आहे. आता वाढलेल्या लाॅकडाऊनच्या काळात नियम पाळून तुम्हीही कोरोनामुक्त व्हा, असा संदेश रुचिता देताना दिसत आहे.
तुम्हाला कोरोनामुक्त व्हायचंय? महाराष्ट्राला कोरोनामुक्त करायचंय ? भारताला कोरोनामुक्त करायचंय ? तर बारामती पॅटर्न राबवा! असे सांगतानाचा रुचिताचा अभिनय झकास झाला असून तिची कला आणि तिचे इंग्रजीतून आश्वासक बोबडे बोल मनाचा ठाव घेतात. बाहेर करोना असून घरातच राहण्याची विनंती मिनीटभराच्या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा ती करत आहे. व्हिडीओमध्ये तिचे खेळातील घर पुन्हा एकदा केंद्रस्थानी आहे.
खेळातून तिने दिलेला ‘स्टे अॅट होमचा’ सामाजिक संदेश आणि तिची कला व्हिडीओद्वारे चित्रित करून सर्वांसमोर आणणाऱ्या रुचिताची आई ज्योती क्षीरसागर म्हणाल्या, करोनाचा प्रादुर्भाव आपल्याकडे होण्याच्या आधी मी हॉस्पिटलमधून घरी येताच रुचिता आनंदाने मला बिलगत होती. आता मी घरी येताच तीची मला भेटण्याची तीव्र इच्छा असूनही भेटता येत नाही. मी संपूर्ण स्वच्छता-आंघोळ करून निर्जंतुक झाल्यानंतरच तिला जवळ घेऊ शकते. याचा तिच्या बालमनावर परिणाम झाला असून रुचिताच्या खेळातही करोना आला. बारामती पॅटर्न म्हणजे काय?हे तिला पूर्णपणे समजत नसले तरी घरातील चर्चेमुळे बारामती करोनामुक्त झाल्याचे तिला उमगले आहे. सर्व ठिकाणाहून करोना ‘निघून’
जावा म्हणून तिची सामाजिक संदेश देण्याची धडपड मी मुद्दाम चित्रीत केली आहे, असे त्यांनी सांगितले.
काय आहे बारामती पॅटर्न – ‘बारामती ४४’
– पोलीस महसूल व आरोग्य प्रशासनाचे एकत्रित काम
– ४४ वार्डात ४४ नगरसेवक, ४४अधिकारी अशी रचना
– शंभर टक्के लाॅकडाऊनचे पालन.
– दुकाना बाहेर गर्दी होते हे लक्षात येताच दुकाने बंद
घरपोच किराणा , दुध, फळे, औषधे. अॅपवर नोंदवावयाची मागणी.
निराधार लोकांसाठी राहण्याची व जेवणाची सोय.
– शहरावर ड्रोनवरून लक्ष. बाहेर पडणा-यांवर कारवाई.
– एक घास मुक्या जीवासाठी. हा भटक्या प्राण्यांसाठी उपक्रम
– प्रत्येक वार्डात १०ते १५स्वयंसेवकही कार्यरत.त्यांच्यामार्फतही वस्तू घरपोच
– माजी सैनिकांचे पोलीसांना सहाय्य
– तीन रंगांचे पास वितरित . पोलीसांना कोरोना वॉरियर, वैद्यकीय सेवा देणाऱ्यासाठी करोना फायटर, सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोना सोल्जर यांनाच तीन विविध रंगांचे पास.यापैकी कोणालाही पास नसेल तर असा नागरिक बाहेर पडू शकणार नाही.
– आवश्यकते नुसार बदलाची तयारी व कठोर अंमलबजावणी
– सूक्ष्म नियोजन.