पाथर्डी – जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात पाथर्डी शहरालगत असलेल्या शिक्षक कॉलनीत चक्क बनावट दारूचा कारखाना असल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत दारू बनवण्याच्या तीन मशिनसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी जांभळीचा माजी सरपंच विजय बाबूराव आव्हाड (रा. जांभळी, ता. पाथर्डी) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर रस्त्यावर माळीबाभूळगाव शिवारातील समर्थनगरमध्ये प्रशांत हॉटेलच्या मागे विजय आव्हाड राहात्या घरी देशी-विदेशी कंपन्यांची बनावट दारू बनवून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह स्वतः बुधवारी (दि.15) बनावट दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून आव्हाड याला बनावट दारू बनवताना रंगेहात पकडले.
या कारवाईत पोलिसांनी बनावट देशी-विदेशी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या तीन मशिनसह दारू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर हस्तगत केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सिंह यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोपी आव्हाड हा जांभळी गावचा माजी सरपंच आहे. त्याच्या विरुद्ध विविध अवैध धंद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, अत्याचार, शासकीय कामात अडथळ, फसवणूक, अशा स्वरूपाचे दहा गंभीर गुन्हे पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.