थेऊर -लॉकडाऊन असले तरी थेऊर (ता. हवेली) येथील राईज एन. शाईन बायोटिक्स कंपनी आवश्यक परवानगीने सुरू आहे. मात्र, कंपनीत तब्बल 200 कामगार असून त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला आहे. तर आवश्यक असलले सुरक्षा किट वापर न वापरताच ही कंपनी सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
येथील राईज एन शाईन बायोटिक्स कंपनीमध्ये बाहेरील गावातील कामगार मोठ्या प्रमाणात येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच मार्च महिन्यातील लॉकडाऊनच्या काळातील पगार न दिल्याच्या तक्रारी व कंपनीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे येथील मंडल अधिकारी गौरी तेलंग यांनी या तक्रारीची दखल घेत गुरुवारी (दि. 16) दुपारी अचानकपणे कंपनीची झाडाझडती घेतलीक त्यावेळेस सुमारे 200 दोनशे कामगार आढळून आले.
त्यांच्याकडे आवश्यक सुरक्षा किट आढळून आले नाही. सोशल डिस्टन्सिंगची तर “ऐशी तैशी’ परिस्थिती आढळल्याने मंडल अधिकारी तेलंग यांनी करोना रोगाच्या नियंत्रणासाठी कंपनीतील कामगारांना आवश्यक सूचना करीत अधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज दिली असून पुन्हा नियमांची पायमल्ली होताना आढळल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयात अहवाल सादर करण्याचा इशारा दिला आहे.
तसेच कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील पगार देण्याबाबत कडक शब्दांत समज दिली आहे. दरम्यान, थेऊर गावामध्ये ग्रामस्थांच्यावतीने येथे पूर्णपणे लॉकडाऊन पाळला जात असून याकामी येथील सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांच्या पथकाची गावातील परिस्थितीवर पूर्णपणे नजर आहे.
कंपनीने आवश्यक ती परवानगी घेतलेली आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी कामगारांची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. त्यांना लॉकडाऊनच्या काळातील पगारही दिला जात आहे. मी कंपनीमध्ये नसल्याने मंडलाधिकाऱ्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत याविषयी माहिती नाही.
– अजित देशपांडे, मुख्यव्यवस्थापक, राईज एन शाईन बायोटेक कंपनी, थेऊर