वॉशिंग्टन – करोनामुळे जगातील 180 देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे अभुतपूर्व आर्थिक संकट जगापुढे उभे राहिले असून त्यातून सावरणे हे अति जिकीरीचे आव्हान बनणार आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जियेव्हा यांनी म्हटले आहे. जगाने आता महामंदीचा सामना करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जगातील 90 देशांनी नाणेनिधीकडे पैशांची मदत मागण्यासाठी तगादा लावला आहे. या मंदीच्या पार्श्वभूमीवर जगाचा विकास दर निगेटिव्ह पातळीवर जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
करोना येण्याच्या आधी काही काळ जगातील 160 देशांमध्ये दरडोई उत्पन्नात चांगली वाढ होत असल्याचे दिसून आले होते. पण आता करोनामुळे मोठा फटका साऱ्याच अर्थव्यवस्थांना बसला आहे. रिकव्हरीची अतिशय चांगली स्थिती गृहीत धरली तरी, पुढील वर्षीही स्थिती सुधारण्याची शक्यता कमी वाटते आहे असे त्यांनी म्हटले आहे. करोना नेमका कधी आटोक्यात येईल आणि स्थिती कधी पूर्वपदावर येईल याविषयी अजूनही काही अंदाज येईनासा झाला आहे, त्यामुळे ही महामंदीची स्थिती अतिशय दयनीय होऊ शकते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.
करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक स्थितीचे सध्याचे नेमके जागतिक चित्र नाणेनिधीकडून येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे. या महामंदीचा फटका अमेरिकेलाही बसण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या मध्यालाच अमेरिकेतील 1 कोटी 70 लाख युवक बेरोजगार झाले आहेत. करोनामुळे अफ्रिकेतही गेल्या 25 वर्षातील पहिलीच मंदी त्यांना अनुभवाला येणार आहे. जागतिक बॅंकेकडे सध्या अन्य देशांना मदत करण्यासाठी 1 ट्रिलियन डॉलर्सचा निधी शिल्लक आहे. नाणेनिधीने आणिबाणीच्या स्थितीत द्यायच्या मदतीची रक्कम दुप्पट केली असून आता या आणिबाणीच्या स्थितीच्या निधीतून विविध देशांना 100 अब्ज डॉलर्सची मदत दिली जाऊ शकते असे क्रिस्टलिना यांनी म्हटले आहे.