दंड, व्याजाबाबत काही सवलती जाहीर
पिंपरी (प्रतिनिधी) -सध्या सुरू असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मिळकत धारकांना पालिकेने दिलासा आहे. दंडव्याजासह काही सवलती जाहीर केल्या असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. तसेच कलम 144 लागू करण्यात आल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कंपन्या, इंडस्ट्रीसह सर्व व्यवसाय सध्या बंद आहेत. मार्च महिन्यातच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे महापालिकेच्या करसंकलनावरही त्याचा परिणाम झाला होता. करसंकलन वाढविण्याबरोबरच नागरिकांनाही दिलासा मिळावा या हेतूने महापालिकेच्या वतीने मिळकतकरामध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.
31 मे पर्यंत मार्च 2020 पर्यंतचा संपूर्ण मिळकतकर भरल्यास थकीत मिळकरावर आकारण्यात येणाऱ्या विलंब दंड रक्कमेमध्ये 90 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. तर तसेच शास्ती फी पूर्णपणे माफ केली जाणार आहे. माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, अंध अपंग, महिलांच्या नावे असलेल्या मिळकती, कर्णबधिर, मुकबधिर तसेच या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या तत्सम व्यक्तींना चालू वर्षाकरिता मिळणाऱ्या सर्व सवलतींचा लाभ देण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.