पिंपरी (प्रतिनिधी) -संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 134 जणांवर गुरुवारी (दि. 9) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दररोज कारवाईचे सत्र सुरू असतानाही नागरिक पोलिसांच्या कारवाईला न जुमानता घराबाहेर फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.
संचारबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडून नागरिक साथीच्या रोगाचा धोका वाढवत आहेत. त्यामुळे पोलिस देखील अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत आहेत. गुरुवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 134 जणांवर कारवाई केली आहे.
त्याचबरोबर देहूरोड पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यान्वये एक गुन्हा दाखल केला आहे. वाकड, देहूरोड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक तर दिघी पोलीस ठाण्यात दोन असे एकूण पाच गुन्हे मुंबई पोलीस कायद्यान्वये नोंदविण्यात आले आहेत.