संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय लांबूनच चेहरा दाखविणार
मृतास स्पर्श करू देणार नाही
पुणे – करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्यांना करोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या हद्दीत करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या व्यक्ती शहराच्या हद्दीजवळील अथवा पुणे जिल्ह्यासह इतर जिल्हातील रहिवासी असल्या, तरी शहरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
शहरात आता करोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एक जण जिल्ह्यातील आहे. मात्र, या रुग्णांचे कुटुंबीय करोना बाधित असल्याने डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असून इतर नातेवाईक गावी आहेत. मात्र, मृत व्यक्तीवर तातडीने अंत्यविधी करणे आवश्यक असल्याने हद्दीबाहेरील व्यक्तीचे मृतदेह त्यांच्या गावी अथवा नातेवाईकाच्या ताब्यात न देता केंद्र शासनाने दिलेल्या अंत्यविधीच्या सूचना नुसार आवश्यक सुरक्षा साधने तसेच सुरक्षा वाहनांचा वापर करून अंत्यविधी केला जाणार आहे.
मात्र, नातेवाईच्या भावना लक्षात घेऊन अंत्यविधी पूर्वी त्यांना एकदा मृत व्यक्तीचा चेहरा सुरक्षा उपाय योजना आणि दूर अंतरावरून दाखविला जाईल. नातेवाईकांना कोणत्याही स्वरूपात मृत व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करून दिला जाणार नाही. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.