IPL 2024 (RCB vs CSK Match 68) : बंगळुरुची प्ले-ऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री; चेन्नईला 27 धावांनी केलं पराभूत…

IPL 2024 (RCB vs CSK Match 68) : आज IPL 2024 चा 68 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. पहिल्या 8 सामन्यात 7 पराभव… प्लेऑफच्या आशा जवळपास धुळीला मिळाल्या होत्या, पण नंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. पहिल्या 8 सामन्यात 7 पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटचे सलग 6 सामने जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव केला आहे. वास्तविक, प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीला किमान 18 धावांनी विजय मिळवावा लागणार होता. या संघाने आपल्या घरच्या मैदानावर सीएसकेला पराभूत करत 27 धावांनी विजय मिळवला आहेे, त्यासोबतच प्लेऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री केली आहे. चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य होते, परंतु 20 षटकात 7 गडी गमावून 191 धावाच करता आल्या.
याआधी कोलकाता नाईट रायडर्सशिवाय राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनीही प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा या मोसमाचा प्रवास संपला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स प्रत्येकी 14 गुण असूनही पात्र ठरू शकले नाहीत. वास्तविक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चांगल्या नेट रन रेटने प्लेऑफसाठी मार्ग खुला केला, परंतु चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त, खराब नेट रन रेट दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्ससाठी खलनायक म्हणून उदयास आला.
तत्पूर्वी,या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.करो या मरो अशा या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्याा होत्या.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने सलामीची जबाबदारी घेतली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची (58 चेंडू) भागीदारी करून बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली. संघाला पहिला धक्का विराट कोहलीच्या रूपाने बसला, जो 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मिचेल सँटनरचा बळी ठरला. कोहलीने 29 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली.
बेंगळुरू संघ पहिल्या विकेटमधून नीट सावरत नाही तोपर्यंत त्यांनी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. कर्णधार धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. डू प्लेसिसने 39 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
यानंतर रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 (28 चेंडू) अशी भक्कम भागीदारी केली. ही भागीदारी १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रजत पाटीदारच्या विकेटने संपली, त्याला शार्दुल ठाकूरने झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाटीदारने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली.
यानंतर 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिकच्या रूपाने संघाला चौथा धक्का बसला. कार्तिकने 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 14 धावा केल्या. त्यानंतर 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने बेंगळुरूने पाचवी विकेट गमावली, ज्याने 5 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. यादरम्यान, कॅमेरून ग्रीनने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38* धावा केल्या. अशा प्रकारे बेंगळुरूने 20 षटकात 5 विकेट गमावत 218 धावा केल्या.
चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने दोन तर तुषार आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.






