पिंपरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कार्यरत ठेवल्या आहेत. तरी, काही व्यावसायिक नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडल्यावर स्वत:च्या सुरक्षेसाठी ‘Social Distancing’ चा अवलंब करावा. संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यासाठी पालिका प्रशासनाने पिंपळे सौदागर प्रभागासह शहरात औषध फवारणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
करोनाचे संकट कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय सेवा व पोलीस प्रशासन दिवसरात्र झटत आहे. तरी देखील काही नागरिकांकडून त्यांना सहकार्य होत नसल्याची परिस्थिती आहे. आपल्या पिंपळे सौदागर भागात सोसायट्यांचा परिसर आहे. याठिकाणी उच्चशिक्षित लोकांचे राहणीमान आहे. परंतू, पोलिसांना याच भागात येऊन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करावे लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरी, नागरिकांनी स्वत:च्या व कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सुरक्षेसाठी स्वत: काळजी घ्यावी, असे आवाहन संदीप काटे यांनी केले आहे.
नागरिकांसाठी बाहेर अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. तरी नागरिकांनी संय्यम बाळगून सुरक्षित अंतर ठेवावा. अत्याश्यक सेवा न पुरविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कारवाई करावी. पिंपळे सौदागर भागात राहणाऱ्या लोकांना किराणा माल, दुध, सिलिंडर, फळे, पालेभाज्या अशा दररोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू घरपोच मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहेत. अशा व्यावसायिकांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.
तसेच, नागरिकांनी सरकारच्या पुढील आदेशापर्यंत आपल्या घरातच थांबावे. इतरांचा सहवास टाळावा. बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. पिंपळे सौदागर भागातील कानाकोपऱ्यात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने निर्जंतुकीकरण फवारणी करावी. आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून आदेश द्यावेत. असेही काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.