पुणे – करोना हा विषाणू समाजाचा शत्रू असून त्याच्याविरुद्धच्या लढाईत शासकीय तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. डॉ. म्हैसेकर यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. देशात करोनाचा उद्रेक होत असून त्याला वेळीच आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगप्रमाणेच वैद्यकीय उपचारांची गरज भासणार आहे.
सुदैवाने परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, भविष्यात विपरित परिस्थिती उद्भवली तर सर्वच यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे, यासाठी साधन सामुग्रीसह इतर आवश्यक बाबींचा आढावा त्यांनी घेतला. वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंट), एन 95 मास्क तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याचे नियोजन केले आहे. करोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागते, त्यानुसार शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत असलेल्या इंटेन्सिव्ह केअर यूनिट (आयसीयू), व्हेंटीलेटर याचीही त्यांनी माहिती घेऊन आवश्यक ते प्रमाणे यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना म्हैसेकर यांनी केल्या.