कात्रज येथे पीएमपीएलच्या वाहक-चालकाचा कारभार; विशेष बससेवेचा लाभ नाहीच
कात्रज – एकीकडे करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने सर्व सेवा बंद असताना रुग्णालयांतील कामे रात्रंदिवस सुरू आहे. याकामात डॉक्टरांसह परिचारिका तसेच रूग्णालयातील कर्मचारी आरोग्य सेवा देत आहेत, त्यामुळे वाहतूक सेवा बंद असली तरी रुग्णालयीन सेवा देणाऱ्यांसाठी पीएमपीएलकडून विशेष बसेस सुरू ठेवण्यात आली आहे; परंतु पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याने अशा बसेसचा उपयोग रुग्णालयातील सेवक वर्गास होत नसल्याचे दिसत आहे.
करोनाच्या विषाणूमुळे अत्यावश्यक सेवेतील रुग्णालयांत सेवेत असणारे डॉक्टर, परिचारिका तसेच इतर मशीन ऑपरेटर, सफाई कर्मचारी यांना लॉकडाऊन परिस्थितीमध्येही सेवा बजाविण्यासाठी जावे लागत आहे. वाहतूक सेवा बंद असल्याने याकामी अडचणी येत आहेत. अशा सेवक वर्गासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आलेली असली तरी तासनतास बसस्टॉप वर ताटकळत उभे राहूनही बस येत नाही.
यामुळे वैद्यकिय कर्मचाऱ्यांना रुग्णालयात जाण्यास वेळ लागत आहे. तर, एकीकडे आदेशानुसार 15 ते 20 प्रवासी बसमध्ये बसल्याशिवाय बस हलवली जाणार नसल्याचे पीएमपीएलचे कर्मचारी सांगत आहेत. यातूनही आरोग्य सेवेवरील ताण वाढतो आहे.
पुणे शहरातील दक्षिण भागाकडे कात्रज भागातील बसस्टॉप वर सोमवारी सकाळी अशीच परिस्थिती पाहायला मिळली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास स्टेशनकडे जाणारी बस लावण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये 10 ते 12 प्रवासी बसलेले असतानाही पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे बस सोडण्यात आली नाही. कर्तव्यावर जाण्यासाठी निघालेले महिला व पुरुष यांनी विनवण्या करूनही कोणी ऐकले नाही. शेवटी कंटाळून बसमधून या सर्व अरोग्य कर्मचारी महिला उतरून मिळेल त्या वाहनाने आपल्या रुग्णालयाकडे रवाना झाल्या. विशेष म्हणजे यातील बहुतेक प्रवाशांकडे मासिक पास होता. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्या मार्फत बसमध्ये बसलेल्या सर्व महिला व पुरुषांची ओळखपत्रे देखील तपासण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनी बस सोडली नाही.
अत्यावश्यक सेवेसाठी ठेवण्यात आलेल्या बसेसमध्ये पहिल्या स्टॉपला दहा प्रवासी बसल्यानंतर बस हलविण्यात यावी, अशी सूचना देण्यात आलेली आहे. आज पहिला दिवस असल्याने गोंधळ झाल्यामुळे कदाचित बस सुटण्यास वेळ झाला असेल. मात्र, आता पुन्हा नवीन सूचना देण्यात येतील.
– अनंत वाघमारे, पीएमपीएल व्यवस्थापक, पुणे मनपा.
बसमध्ये सुमारे दहा महिला व दोन तीन पुरुष बसले होते. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी 20 प्रवासी झाल्याशिवाय बस हलवली जाणार नाही, असे सांगितले. आम्ही बारा वाजेपर्यंत बसमध्ये बसून होतो. त्यानंतर त्यांना विनवण्या देखील केल्या. मात्र, त्यांनी ऐकले नाही, शेवटी आम्ही बसमधून उतरलो.
– प्रतीक्षा मारखंडे, कात्रज, डायलेसिस थेरपिस्ट