जमैका – चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंच्या धोक्यामुळे जागतिक क्रिकेटला खूप मोठा फटका बसला आहे. अनेक देशांनीही विविध स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यातच आता वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडला आपल्या देशात या आणि स्पर्धा आयोजित करा असे आमंत्रण दिले आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड व श्रीलंका या क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख देशांनी करोनाच्या वाढत असलेल्या धोक्यामुळे अनेक स्पर्धा व मालिका रद्द केल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका तसेच प्रचंड आर्थिक लाभ देणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पुढे ढकलली आहे. त्यामुळे सध्या जागतिक व स्थानिक स्तरावर कोणतेही क्रिकेट खेळले जात नाही अशी स्थिती आहे. त्यातूनच मार्ग निघू शकतो असे सांगत वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपल्या देशात या व सामने आयोजित करा असे आमंत्रण क्रिकेट जगताला दिले आहे.
वेस्ट इंडिजमध्ये जरी करोनाचा एक रुग्ण सापडला असला तरी उर्वरीत जगात जी भयावह परिस्थिती आहे तशी येथे नाही. आता तर या विषाणूंचा प्रसार ज्या देशातून झाला त्या चीनमध्येही करोनाचा प्रभाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत करोनाचा धोका पूर्णपणे संपुष्टात आलेला दिसेल असेही मंडळाने व्यक्त केले आहे.