हर्षवर्धन पाटलांना आणखी पाच वर्षे विजनवास : अवघ्या सहा महिन्यांत कलाटणी
– सचिन खोत
पुणे – इंदापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर वर्चस्व प्रस्थापित करणारे पूर्वीचे कॉंग्रेसचे आणि सध्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना आणखी पाच वर्षे विजनवासात जावे लागले आहे. लोकसभेवेळी पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी निणार्यक भूमिका बजावली होती. त्यावेळी ते “हिरो’ ठरले. मात्र, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर पाटील यांनी भाजपची वाट धरली. आता सत्तांतर झाल्यामुळे पाटील यांच्यासाठी आगामी पाच वर्षे बिकटच आहेत. त्यामुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्थवस्थता पसरली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पीछेहाटीनंतर इंदापूरवर राष्ट्रवादीची मांड पक्की होणार आहे.
1995 ते 2009 पर्यंत पाटील यांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी नव्हते. त्यानंतर अजित पवार यांनी पाटील यांच्यसमोर दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने मल्ल उतरविण्यासाठी तयारी केली. तळागाळात काम करण्यासाठी भरणे यांनी पद देऊन घराघरात पोहचविले. मात्र, त्याचवेळी पाटील गाफील राहिले. मंत्री असतानाही पाटील यांना इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्यांची बदलती मानसिकतेची नस पकडता आली नाही. त्यामुळे पाटील यांचे मंत्रिपदाचे वलय हे 2009 ते 2014 दरम्यान ओसरले.
2014 लोकसभा निवडणुकीत बारामतीसाठी हर्षवर्धन पाटील धावून गेले. त्यात सुळे यांना मताधिक्य दिले. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची युती तुटली. त्यामुळे राष्ट्रवादीला भरणे यांच्या रुपाने विजयाची संधी मिळाली. यात भरणे यांनी विधानसभेत प्रवेश केला. कार्यकर्त्यांचा गोतावळा आणि मंत्रिपदाचा विरह यातून हर्षवर्धन पाटील हे तत्काळ सावरले. त्यानंतर जोमाने कामास सुरूवात केल्यानंतर कार्यकर्त्यांची विस्कटलेली घडीची मोट बांधली. गेल्या पाच वर्षांत पाटील यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम केले.
तीन शिलेदारांपैकी एकाचा वनवास
बारामती लोकसभा मतदारसंघात भोर, पुरंदर, इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेसचे नेते खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी झटले. यात पुरंदरचे संजय जगताप यांना आमदारकीची लॉटरी लागली. तसेच भोरमध्ये संग्राम थोपटे यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे बळ मिळाले. त्यामुळे भोर आणि पुरंदरला कॉंग्रेसचा हात मजबूत झाला. मात्र, या दोन नेत्यांना संघटित करून सुळे यांना मताधिक्य देणारे पाटील हे आघाडीची साथ सोडत कमळाकडे धाव घेतली. त्यात त्यांचा पराभव झाला. यामुळे तीन शिलेदारांपैकी पाटील यांचा वनवास आणखी पाच वर्षांनी लांबला आहे.
माने, तांबिलेंसारखे युवा कार्यकर्ते…
इंदापूर तालुक्यात शरद पवार आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीची मजबूत फळी उभारली आहे. यात पहिल्या, दुसऱ्या फळीसह तळागाळापर्यंत सहकाराच्या माध्यमातून संघटन आहे. त्याचा पुरेपर फायदा राष्ट्रवादीने करून घेतला आहे. सभापती प्रवीण माने, जि.प.सदस्य अभिजित तांबिले यांच्या सारखे युवा नेतेही इंदापुरात घडत आहेत. त्यामुळे आगामी काळातही राष्ट्रवादीला आणखी भक्कम नेटवर्क उभारता येणार आहे. सध्यस्थितीला राष्ट्रवादी इंदापूरात मजबूत झाली आहे.