नगर – भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या नगरसेवकांची मुदत येत्या जानेवारीमध्ये संपुष्ठात येत असल्याने प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वाच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिलेल्या आदेशामुळे या निवडणुकीत तब्बल 2 हजार 311 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना आता मतदान करता येणार नाही. कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार प्रशासनाने सर्व्हेक्षण करून हे मतदार वगळले असल्याची माहिती कॅन्टोमेंट बोर्डचे मुख्याधिकारी विद्याधर पवार यांनी दिली.
भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत जानेवारीमध्ये संपत आहे. त्यानुसार येत्या 5 डिसेंबरला दोन प्रभागासाठी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार होती. परंतु काही कारणास्तव ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सुरवातीला बोर्डाच्या सात नगरसेवकांची बैठक घेवून अनुसुचित जातीसाठीचा प्रभाग निश्चित केला जाणार आहे. त्यानंतर महिला राखीवचे दोन प्रभागासाठी सोडत काढली जाणार आहे. भिंगार कॅन्टोमेंट बोर्डचे सात प्रभाग असून सात नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यातील प्रभाग 7 हा अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा प्रभागातून दोन प्रभाग महिला राखीव होणार आहेत.
सन 2017 मध्ये सर्वाच्च न्यायालयाने कॅन्टोमेंट बोर्डच्या हद्दीत असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा महत्वापूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयाने केंद्र सरकारकडून अंमलबजावणी तातडीने करण्यात आली. त्यानुसार या निर्णयाची माहिती भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या सर्व नगरसेवकांना देण्यात येवून तसा ठराव देखील करण्यात आला होता. गेल्या सप्टेंबर महिन्यात भिंगारमध्ये घरोघरी जावून कॅन्टोमेंट बोर्डच्या कर्मचाऱ्यांनी सर्व्हे केला. त्यानुसार 2 हजार 311 मतदारांचे रस्त्यावर तसेच शासनाच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण आढळून आले.
या सर्वांना मतदार यादीतून आपले नाव का वगळू नये अशी नोटीस बजावून त्यांच्या हरकती व सुचना मागविण्यात आल्या. त्यात 250 जणांनी हरकती घेतल्या होत्या. सन 2015 मध्ये झालेल्या भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या निवडणुकीसाठी 16 हजार 724 मतदार होते. पण आता जानेवारी 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी 14 हजार 413 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. प्रभाग 1 मध्ये मतदार वाढले असून उर्वरित सहा प्रभागात मतदारांची संख्या सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कमी झाली आहे. प्रभागनिहाय मतदारांची संख्या कंसात 2015 ची संख्या आहे. प्रभाग 1 – (789) 953, प्रभाग 2 – (3342) 3036, प्रभाग 3 – (2592) 1905, प्रभाग 4 – (2824) 2535, प्रभाग 5 – (2329) 2096, प्रभाग 6 – (2447) 1707, प्रभाग 7 – (2401) 2181.
कॅन्टोमेंट बोर्डच्या कायद्यात 2006 मध्ये ज्या घरांना नंबर आहे ते अधिकृत धरून त्या मतदारास मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या प्रशासनाने घरोघरी जावून सर्व्हे न करता मतदार यादी तयार केली आहे. त्यामुळे या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. हे सर्व 2 हजार 311 मतदारांना मतदान करण्याचा अधिकार देण्याची मागणी करणार आहे.
सय्यद मुसद्दीन अब्दुल रहिम, उपाध्यक्ष भिंगार कॅन्टोमेंट बोर्ड