मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केल्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या आमदारांची संख्या 169वर पोहोचली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीला अवघे 24 तास उरले असताना बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी महाविकास आघाडीला आपला पाठींबा जाहीर केला आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीला पाठींबा देण्याची घोषणा बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी केली आहे. हितेंद्र ठाकूर, त्यांचा मुलगा क्षीतिज आणि राजेश पाटील या तीन आमदारांनी आघाडीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे 288 सदस्यांच्या सभागृहात आघाडीला पाठींबा देणाऱ्या आमदारांची संख्या 169वर पोहोचली आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
पुर्वी चार दशक कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांनी सहा वर्षापुर्वी स्वत:चा पक्ष स्थापन केला. या पक्षाचा पालघर जिल्ह्यात वरचष्मा आहे. वसई विरार महापालिकेतही या पक्षाची सत्ता आहे. शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आघाडीने निकाल लागल्यानंतर तातडीने भाजपाला पाठींबा दिला होता.