चंद्रकांत पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याची खेळी
कोथरुड – कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने विरोधकांनी पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या हेतूने एकच उमेदवार देण्याची खेळी सुरू केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले असून त्यादृष्टीने जुळवाजुळव सुरू झाली आहे.
कोथरुड हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. येथे सतत भाजप-शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या दृष्टीने सुरक्षित मतदार संघ असल्याने थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदार संघातील विरोधक मात्र एकत्र येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडल्याचे जाहीर केले होते. पण, आता चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे राजकीय आडाखे बदलत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे.
दरम्यान, भाजपने बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने स्थानिक भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्वांना एकत्र करुन एखादा तुल्यबळ उमेदवार मिळतो का, याबाबत राष्ट्रवादीने चाचपणी सुरू केली आहे. यासाठी स्थानिक नेत्यांनी आता भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
याचदरम्यान मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सर्वच विरोधकांनी एकत्र येऊन एकच उमेदवार देण्याच्या निर्णयाला थोडा “ब्रेक’ लागू शकतो, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे राज ठाकरे यांच्याशी बोलून काही मार्ग काढू शकतात, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.