पुणे – महापौर पदाची जबाबदारी असताना विधानसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या मुक्ता टिळक या पहिल्याच महापौर ठरल्या आहेत. त्यांना कसबा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे.
सर्वोच्च असलेले महापौर पद मिळाल्यानंतर महापालिकेत अन्य कोणतेच पद भूषवू नये अलिखित संकेत आहे. त्यामुळे काही महापौरांना थेट विधान परिषदेत किंवा राज्यसभेत संधी दिली जाते. यामध्ये शहराचे पहिले महापौर बाबुराव सणस, ऍड. वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, ऍड. चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर यांचा समावेश आहे. यामध्ये ऍड. चव्हाण या सध्या राज्यसभा सदस्या आहेत. परंतु, महापौर असताना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरून लढण्याची संधी आतापर्यंत शहरात टिळक यांनाच मिळाली आहे.
2017 मध्ये टिळक या महापौर झाल्या. ऑगस्टमध्ये महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे ती तीन महिने पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे टिळक यांचे महापौरपद कायम राहिले होते.