तालुकाध्यक्षपदी स्वप्निल सावंत यांची नियुक्ती
रेडा – माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसचा “हात’ सोडत भाजपचे “कमळ’ हाती घेतल्याने इंदापूर तालुक्यात कॉंग्रेसचे प्रमुख पद कोणाला मिळणार अशी चर्चा रंगली होती. परंतु कॉंग्रेसचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी स्वप्नील सावंत यांच्या नावाला मान्यता देऊन तालुक्यातील जुने कारभारी बदलले आहेत. स्वप्निल सावंत यांना नियुक्तीचे पत्र पुणे येथे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ बराटे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 24) प्रदान करण्यात आले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असल्यामुळे इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप यांच्यातील मातब्बर नेत्यांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे भाजपचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या “घड्याळा’ला कॉंग्रेसच्या “हाता’ची नितांत गरज आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे भाजपवासी झाल्याने कॉंग्रेसमधील नेते आघाडीचा धर्म पाळणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. तर पाटलां सोबतच्या अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आजपर्यंत पक्षाकडे राजीनामे दिलेले नाहीत. तर कॉंग्रेसच्या माध्यमातून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या नुकत्याच निवडी करण्यात आल्याने इंदापूर तालुक्यात पुन्हा कॉंग्रेसच्या पोस्ट सोशल मीडियावर झळकताना दिसत आहेत.