चाफळ – सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या पोलीस दलामुळे आपण आपल्या घरी रात्रीच्या वेळी निवांत झोप घेतो. मात्र, याच पोलीस दलाला किती अडचणींना सामोरे जावे लागते हे पहायचे असेल, तर पाटण तालुक्यातील चाफळ येथील पोलीस निवासस्थानाला भेट दिलीच पाहिजे. या इमारतीला लागलेली घरघर पाहून मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानापैकी एक म्हणून श्रीराम मंदिर देवस्थानची ओळख आहे. विविध राज्यातून हजारो भावीक रोज दर्शनासाठी येत असतात. येथील पोलीस निवासस्थानाची दुरावस्था झाली असून याकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी लक्ष घालून पाठपुरावा करावा व निधी उपलब्ध करून येथील पोलीस निवासस्थानाची नवीन इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे चाफळ पोलीस आऊटपोस्ट येते.
या विभागात दहा गावे, 75 छोट्या-मोठ्या डोंगरमाथ्यावरील वाड्यावस्त्या आहेत. चाफळ विभाग नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. त्यामुळेच येथील पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते. एकीकडे अशी स्थिती असताना येथे पोलीस कर्मचाऱ्यांचीही वाणवा आहे. केवळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर येथील कामकाज चालते. त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. चोवीस तास ऑनड्युटी रहावे लागते. त्यामुळे त्याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे.
सध्या येथील पोलीस दूरक्षेत्राची इमारत बऱ्यापैकी आहे. मात्र दोन पोलिसांना राहता यावे यासाठी सन 2001 मध्ये बांधलेल्या इमारतीतील सर्व फरशा जागोजागी उध्वस्त झाल्या आहेत. तर भिंतीला तडे गेले आहेत. खिडक्या, दरवाजे मोडून पडले आहेत. लाईटचे वायरिंग तुटून पडले आहे. पाण्याची टाकी देखील फुटली आहे. इमारत वापरात नसल्याने सभोवताली भरपूर गवत वाढले आहे. संपूर्ण इमारत धोकादायक स्थितीत असल्याने येथील पोलिसांना दुसरीकडे भाड्याच्या खोलीमध्ये रहावे लागत आहे. त्यामुळे या निवासस्थानाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.