कोथरुड – जागा वाटपात कोथरुड मतदार संघ मित्र पक्षाला सोडणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेल्या इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला असून त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. पक्षाचा निर्णयाचा आदर करत पक्ष सांगेल त्याचे काम करण्याची तयारी कोथरुड मधील कार्यकर्त्यांकडून दाखवली जात आहे.
रविवारच्या मेळाव्यात पवार यांनी कोथरुड मतदार संघ मित्र पक्षाला देण्याचे जाहीर केले मात्र मित्र पक्ष कोणता हे जरी त्यांनी सांगितले नसले तरी मनसे साठी ही जागा सोडली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या निर्णयामुळे कोथरुड मधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या अनपेक्षित निर्णयामुळे धक्का बसल्याचे पाहिला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने २००९ व २०१४ च्या निवडणुकांमध्ये चांगली मते मिळवली होती. पक्षाला मानणारा वर्ग या मतदार संघात आहे. पक्षाच्या मतांबरोबरच वैयक्तिक ताकद असणारा उमेदवार राष्ट्रवादीने दिल्यास या निवडणुकीला चांगली लढत पाहिला मिळेल असे बोलले जात होते. आता ही जागा मित्र पक्षाला दिली गेली असल्याने जो कोणी उमेदवार असेल त्याचे आघाडीच्या पाठिंब्यामुळे बळ वाढणार आहे.
पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले दोन इच्छुकांनी कोथरूड मधून निवडणूक लढवण्यासाठी चांगली तयारी चालू केली होती या निर्णयाबाबत त्यांना विचारले असता डाकले म्हणाले, कोणत्याही कार्यकर्त्याची पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असते. त्यानुसार मीही तयारी करत होतो. मतदार संघ सोडू नये अशी मागणी ही केली होती परंतु राज्याचा विचार करत असताना पक्षश्रेष्ठी योग्य विचार करत असतात म्हणूनच हा निर्णय मान्य करत पक्ष सांगेल त्याचे काम आम्ही सर्व कार्यकर्ते करणार आहोत. दुधाने म्हणाले, मागील एक वर्षात पक्षाची मतदार संघात चांगली बांधणी करण्यात आली होती. कार्यकर्ते उत्साहात कामाला लागले होते. परंतु राज्य पातळीवर सर्व मित्र पक्षांना सामावून घेत असताना वरिष्ठांनी जे निर्णय घेतले आहेत त्याच्या पाठीशी मतदार संघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उभे आहोत व जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचे आम्ही प्रामाणिक पणे काम करणार आहोत.