गणेश घाडगे
उदयन गडाख यांच्या पाठोपाठ विष्णुप्रसाद मुरकुटे सक्रिय
नेवासे – धार्मिक स्थळांमुळे प्रसिद्ध असलेल्या नेवासे तालुका गेल्या काही महिन्यांपासून राजकीय आखाड्यांमुळे गाजू लागला आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून खालच्यापातळीवर जावून एकमेकांचे तोंड सुख घेण्यात येत आहे.ज्या नेवाश्यात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. साक्षात शनिदेव ज्या तालुक्यात अवतरले. त्या नेवाश्यात आमदार होण्यासाठी एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे.
या अशा राजकीय आखाड्यात आता आजी माजी आमदारपुत्र सक्रिय झाले आहेत. माजी आमदार शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे चिंरजीव विष्णुप्रसाद हे गेल्या काही वर्ष राजकारणापासून दूर होत. पण यंदाच्या विधानसभेत हे दोन्ही आमदार पुत्रांनी पित्यासाठी राजकारणात एंट्री केल्याने हा नेवाश्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
नेवासे मतदारसंघात आ. मुरकुटे आणि गडाख व सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांच्यातील राजकीय जुगलबंदी गेली पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व जिल्ह्यात परिचित आहे. गडाखांच्या तालिम तयार झालेले आ. मुरकुटे सध्या गडाख कुटुंबांवर जोरदार टिका करीत आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुरकुटे – गडाख या पाच वर्षातील पारंपरिक विरोधकांची जुगलबंदी संपूर्ण जिल्ह्याने पहिली असून आता आ. मुरकुटे आणि प्रशांत गडाख यांच्यात सुरू झालेली प्रश्न उत्तरांची जुगलबंदी सध्या चांगली चर्चेत आला आहे. यापुढे जुगलबंदीचा हा राजकीय वारसा पुढची पिढी देखील कायम ठेवते की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. कारण गेल्या पाच वर्षापासून किंबहुना त्याहून अधिक काळापासून शंकरराव गडाख यांचे पुत्र उदयन हे राजकारणात सक्रिय झालेले आहेत. गडाख यांनी क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले तर आ. मुरकुटे हे पुन्हा भाजपच्या उमेदवारीसाठी सज्ज झाले.
गडाख पुत्र उदयन हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले असताना आता आ. मुरकुटे यांचे पुत्र विष्णुप्रसाद यांनी देखील राजकारणात उडी घेतली आहे. एवढे दिवस सक्रिय राजकारणापासून दूर असलेले विष्णुप्रसाद विधानसभेच्या तोंडावर सक्रिय झाले असून मतदारसंघात गाठीभेटी आणि कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. उदयन व विष्णुप्रसाद यांची राजकीय एंट्री नेवाश्यात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. मतदारसंघातील विविध कार्यक्रमात वडील आ. मुरकुटे यांच्या परस्पर विष्णुप्रसाद कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.
उदयन यांना घरातूनच राजकीय बाळकडू मिळाल्याने त्यांनी तालुक्यात तरुणाचे गावोगावी तरुण मंडळे स्थापन करून आपली स्वतःची तरुणाची एक मजबूत फळी तयार केल्याचे बोलले जात आहे. आ. मुरकुटेंनी तालुक्यात नुकतेच महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विष्णुप्रसादची भूमिका महत्वाची ठरली आहे. पुत्र आपल्या वडीलाप्रमाणेच राजकीय आखाडा गाजवण्यासाठी सक्रिय झाले असून आपल्या वडिलांचा जुगलबंदीचा वारसा ते पुढे चालवतील का? हे लवकरच कळणार आहे. या दोन्ही युवानेतेचे तालुक्यातील तरुणामध्ये एक चांगलीच क्रेझ तयार झाली आहे.
उच्चशिक्षित युवा नेते
उदयन यांचे शिक्षण एम. बी. ए. पर्यंत तर विष्णुप्रसाद यांचे बी. एस्सी. पर्यंतचे शिक्षण आहे. दोघेही पदवीधर आणि उच्च शिक्षित असल्याने त्यांच्या कामाचा फायदा दोन्ही नेत्यांना होणार आहे. सध्या दोन्ही युवानेते मतदार संघात फिरत आहेत.