पुणे – पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून बॅंकॉककरिता आता थेट विमानाचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. बॅंकॉक एअरवेज कंपनीने पुण्यातून बॅंकॉकसाठी थेट विमान सुरू करण्याकरिता तयारी दर्शवल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने सोमवारी दिली. तसेच, दिवाळीपर्यंत ही विमानसेवा सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.
सद्यःस्थितीत पुण्यातून बॅंकॉकला जाण्याकरिता एकही थेटविमासेवा नसल्याने प्रवाशांना कनेक्टिंग विमानसेवेचा पर्याय निवडावा लागतो. पुण्यातून बॅंकॉक, सिंगापूर या ठिकाणी गतवर्षी तब्बल 40 हजार प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, त्यांना कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करावा लागल्याने त्यांची गैरसोय झाली होती. दरम्यान, पुणे-बॅंकॉकपाठोपाठ पुण्यातून भुवनेश्वर, कोलकाता, गुवाहाटी, जयपूर, पोर्ट ब्लेअरकरिता देखील बॅंकॉक एअरवेजकडून थेट विमान सुरू करण्यात येणार आहे. सध्या या पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.