भोपाळ : कर्नाटक आणि गोव्यातील राजकिय घडामोडींचा इतर राज्यातील कॉंग्रेसने चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसत आहे. कारण मध्यप्रदेशच्या कॉंग्रेसने मागील दहा दिवसांत 3 बैठक बोलवली असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील परिस्थिती पाहता आपल्या आमदारांच्या एकजूटीसाठी मध्यप्रदेश सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.
कर्नाटकातील सत्तासंघर्षानंतर कॉंग्रेस पक्ष चांगलेच सावध झाले आहे. त्यात मध्यप्रदेशातील आपले आमदार वाचवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसत आहे. मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांपैकी 114 कॉंग्रेस तर भाजपचे 109 आमदार आहेत. तर कमलनाथ यांना बसपचे दोन, सपाचे दोन आणि चार अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. यासर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठीच कमलनाथ सध्या प्रयत्न करत आहेत. त्यासाठी येत्या बुधवारी पुन्हा एकदा महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या बैठकीची तयारी पुर्ण करण्यात आली असून राज्यात येत्या बुधवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या पुर्वसंध्येला ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. यापुर्वी 7 आणि 11 जुलै रोजी अशा बैठका पार पडल्या आहेत.