पुणे-कोलाड महामार्ग ‘ब्लॉक’

पिरंगुट – सुट्टीचा मुहूर्त साधत वर्षाविहारासाठी मुळशीत पर्यटकांनी शनिवारी (दि. 13) व रविवारी (दि. 14) गर्दी केली होती. त्यामुळे पुणे-कोलाड महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी होती तर काही ठिकाणी संथ गतीने सुरू होती. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पौड पोलिसांच्या वतीने योग्य ती उपाययोजना करण्यात आली होती.

पावसाळा सुरू होताच अनेक पर्यटकांची पावले मुळशीकडे वळतात. विशेषत: रविवारी अनेक हौशी पर्यटक हे निसर्ग सौदर्याचा आनंद घेण्यासाठी मुळशी तालुक्‍याच्या विविध भागात येतात.

या मार्गांचा वापर केल्यास कोंडी टळणार
पर्यटक पुणे-ताम्हिणी या एकाच रस्त्याचा वापर करत असल्याने वाहतूककोंडी होते. शनिवार, रविवार, सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांच्या वाहनांनी भुगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा, पौड, मुळशी, पळसे येथे वाहतुक कोंडी होऊन पर्यटक तासन्‌तास अडकून पडतात. त्यामुळे मुख्य रस्त्याला पर्यायी रस्त्यांचा वापर झाल्यास कोंडी होणार नाही. पिंपरी चिंचवडहून येणारऱ्यांनी घोटावडे फाटामार्गे जाण्याऐवजी दारवली-घोटवडे-माण-हिंजवडी मार्गे गेल्यास वाहतूक कोंडीत अडकणार नाही. मावळात जाण्यासाठी पौड-कोळवण मार्ग वापरावा. पुण्यात ये-जाण्यासाठी पौड-दारवली-घोटावडे-चांदे-नांदे-सुसमार्गे बाहेर पडता येईल. पुण्याहून लवासाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या पर्यटकांनी पिरंगुट घाटाअलीकडील मुकाईवाडी मंदिराजवळचा रस्ता वापरल्यास पिरंगुट गाव, घोटावडे फाटा येथील कोंडीस सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पर्यटकांनी या पर्यायी मार्गांचा आवर्जुन वापर केल्यास त्यांना पर्यटनाचा अधिक आनंद घेता येणार आहे.

मुळशीत येणाऱ्या पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळावे, रस्त्यावर लेन कटींग करू नये, मद्यपान करुन वाहन चालवणे धांगडधिंगा करु नये, पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे. बेशिस्त व शांतता भंग करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
– अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक, पौड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.