Ajit Pawar : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच देशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. दरम्यान, नुकतेच सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यावरून आता राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना काही सूचना केल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांनी ओबीसी किंवा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आमदारांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याची सूचना केल्याचे म्हटले जात आहे.
ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील वातावरण तापत असताना, ओबीसी आमदारांनी आपआपल्या तालुका पातळीवर त्यांना जो योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा अशी सूचना देखील दिली गेली आहे.
आगामी काळात ओबीसी मराठा संघर्ष आणखी वाढणार असल्याने अजित पवारांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच, मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात जाण्याची अजित पवार यांनी शक्यता वर्तवली आहे.