Ajit Pawar On Sharad Pawar – मी शरद पवार यांचा मुलगा नसल्याने मला संधी नाकारली, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘आता माझे वय 60 पेक्षा जास्त झाले आहे. आता किती दिवस थांबायचे? आम्हाला देखील संधी नको का? त्यामुळे भावनिक होऊ नका, पवार साहेब आमचे दैवत आहे, त्यामध्ये दुमत नाही. पण 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी. मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही? केवळ मी त्यांचा मुलगा नाही, त्यामुळे मला संधी नाही? हा कोणता न्याय? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
बारामतीचा विकास कसा केला पहा –
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक ताब्यात घेतली. आणि आजपर्यंत जिल्हा बँक, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे. बारामतीचा विकास कसा केला हे येऊन पहा. अनेक लोक आम्हाला निवडून द्या आम्ही बारामती सारखा विकास करू, असे आश्वासन देतात. यावरूनच आमच्या बारामतीच्या विकासाचा प्रत्यय येतो.